सध्याचे युग मिडियाक्रांतीचे आहे. मिडिया तंत्रज्ञानात अतिशय वेगाने विकास झाल्याने ज्यासाठी पूर्वी इतरांवर अवलंबून रहावे लागत होते, ती कामे आपण सोप्या आणि स्वस्त साधनसामग्रीच्या साहाय्याने स्वतःच करू शकतो. स्वतःचा चित्रपट काढणेही घरबसल्या शक्य व्हावे इथपर्यंत तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. सध्या ओटीटी किंवा ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्मची चर्चा आहे. या तंत्रज्ञानामुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत, असे म्हणणे दिशा पटनी या प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडले आहे. संपर्क क्रांती झाल्यामुळे अनेकांना घरबसल्या आकर्षक उत्पन्नाची साधने प्राप्त झाली आहेत. सध्याच्या आव्हानात्मक काळात या तंत्रज्ञानाचा मोठाच आधार लोकांना मिळत आहे, असे त्या म्हणतात.
सध्या लोक कोरोना निर्बंधांमुळे घरातून बाहेर पडून चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहू शकत नाहीत. तथापि, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे एकाच वेळी कोटय़वधी लोकांना नवीन प्रदर्शित झालेला चित्रपट घरबसल्या पाहता येतो. त्यामुळे चित्रपट व्यवसाय सुरू राहिला आहे, असेही त्यांच्यासह या क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे म्हणणे आहे.