शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे समाधान
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याने लावला ४८ तासाच्या आत आरोपीचा तपास
तरुण भारत संवाद तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव (देशमुख) येथील राम पंडित हत्तरके वय ४०, रा. बोरगाव दे. या शेतकऱ्याच्या शेती पंपावरील विद्युत मोटार चोरीप्रकरणी एक आरोपीला ४८ तासाच्या आत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याने अतिशय चलाखीने पकडले. महेश सर्जानंद हत्तरके वय ४०, रा. बोरगाव दे. असे या आरोपीचे नाव आहे. २१ मे रोजी मध्यरात्री अत्यंत शिताफीने या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चोरीची घटना दि. १७ मे रोजी सायंकाळी घडली होती.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बोरगाव दे. येथील राम पंडित हत्तरके या शेतकऱ्यांनी आपल्या भावकीच्या सामाईक विहिरीवर पाळीप्रमाणे शेतीसाठी पाणी घेण्यासाठी स्वतःच्या मालकीची पाणबुडी मोटार बसवली होती. दि. १७ मे रोजी राम हत्तरके हे पाण्याची पाळी असल्याने शेतात पिकांना पाणी देऊन सायंकाळी ६ वाजता घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेले असता त्यांना शेती पंपावरील विद्युत मोटारीचे पाईप कट झाल्याचे दिसून आले विहिरीत डोकावून पाहिले असता पाणबुडी मोटार ही चोरी झाल्याच्या त्यांच्या लक्षात आले. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची नितांत गरज असताना विहिरीतील मोटार चोरीस गेल्याने राम हत्तरके व त्यांचे कुटुंबीय मोठ्या अडचणीत सापडले.
याबाबत राम पंडित हत्तरके यांनी दि. १९ मे रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या दिवसापासून पोलीस पथक चोरट्यांच्या मार्गावर होते. गोपनीय बातमीदाराचा आधार घेत पोलिसांनी आपला मोर्चा बोरगाव गावाकडे वळवला. दि. २१ मे रोजी रात्री ११ च्या दरम्यान संशयित आरोपी म्हणून महेश सर्जानंद हत्तरके रा. बोरगाव दे. याला ताब्यात घेऊन अत्यंत चलाखीने विचारपूस केली असता आरोपी महेश सर्जानंद हत्तरके यांनी विद्युत मोटारीची चोरी केल्याचे कबूल केले. चोरी केलेली मोटार दुसऱ्याच्या शेतात लपवून ठेवले होते. पोलिसी खाक्या पडताच आरोपीने चोरलेली ६ हजार किंमतीची मोटार पोलिसांच्या स्वाधीन केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वागदरी बिटचे पोलीस हवालदार अंगद गीते व विपीन सुरवसे यांनी या ४८ तासांमध्ये चोरीचा छडा लावला. गेल्या अनेक दिवसापासून शेती साहित्याची चोरी होत होती. या अटकेनंतर शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी पो. ना. महादेव चिंचोळकर, प्रवीण वाळके,राम चौधरी, शिवलिंगय्या स्वामी या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा काम पाहिले.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अंगद गीते हे करीत आहेत.
यातून अनेक चोऱ्या उघडकीस येतील
अक्कलकोट तालुक्यात आजवर अनेक शेती विषयक साहित्याची चोरी झालेली आहे. आता बोरगाव येथून एक आरोपी पकडला आहे. याच्या माध्यमातून अनेक चोऱ्या उघडकीस येऊ शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही चोरट्यांच्या शोधात होतो. सदर गुन्ह्यात सापडलेल्या आरोपींकडून माहिती घेऊन इतर चोरीच्या गुन्ह्याचा तपास केला जाईल.
– गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक उत्तर पोलीस ठाणे अक्कलकोट