क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यासाठी गिफ्टचे अमिष
प्रतिनिधी/ सातारा
एक अनोळखीने मोबाईलवरुन फोन करुन ऍक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगत एका महिलेचा क्रेडीट कार्डचा क्रमांक मागून घेतला. त्यानंतर तिच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागून घेत महिलेच्या बँक खात्यावर तीन वेळा ऑनलाईन ट्रांझेक्शन 1 लाख 7 हजार 335 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अनोळखीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 मार्च रोजी यातील तक्रारदार महिला तृप्ती प्रसन्न साळुंखे (वय 27, रा. करंजे, सातारा) यांना एका 88211058334 व 88291071256 या मोबाईल क्रमांकावरुन अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने साळुंखे यांना ऍक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या क्रेडिट कार्डाचे लिमिट वाढवण्यासाठी आकर्षक योजना असून त्यांना 9 हजार 500 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर मिळणार असल्याचे सांगितले.
साळुंखे यांच्याकडून अनोळखीने क्रेडीट कार्डाचे शेवटचे चार अंक व त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचार घेतला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने दि. 15, 16 व 18 मार्च रोजी तीन ट्रांझेक्शन करुन साळुंखे यांच्या बँक खात्यावरुन 1 लाख 7 हजार 335 रुपये त्याच्या अकौंटवर वर्ग करुन त्यांची फसवणूक केली. याबाबत साळुंखे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनोळखीवर गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.