मुंबई / वृत्तसंस्था
चेन्नई सुपरकिंग्स संघाचा सुपरस्टार कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर उत्तूंग फटकेबाजीचा जोरदार सराव केला आणि आक्रमक फलंदाजीचे आपले इरादे असतील, याचाच जणू दाखला दिला. धोनीने विशेषतः फिरकी गोलंदाजांना सामोरे जाताना पुढे सरसावत मोठे फटके लगावले. चेन्नई सुपरकिंग्स संघाने त्याच्या सरावाचा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यात थाला पराक फुल्ली लोडेड, असे म्हटले आहे.
धोनी आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणारा अव्वल भारतीय फलंदाज ठरला असून त्याने 204 सामन्यात 216 षटकार वसूल केले आहेत. आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकारांचा विक्रम ख्रिस गेलच्या खात्यावर आहे. त्याने 132 सामन्यात 349 षटकारांचा विक्रम नोंदवला आहे. याशिवाय, एबी डीव्हिलियर्स 169 सामन्यात 235 षटकारांसह या यादीत दुसऱया स्थानी आहे.
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईची पहिली लढत शनिवार दि. 10 रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईत होईल. तीनवेळा जेतेपदावर आपली मोहोर उमटवणारे चेन्नई सुपरकिंग्स यंदा मुसंडी मारण्यासाठी प्रयत्नशील असतील. मागील हंगामात त्यांच्या पदरी प्ले-ऑफपूर्वीच आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की आली होती. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात प्ले-ऑफपूर्वी गारद होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ ठरली. यंदा त्या अपयशाची सव्याज परतफेड करण्याचा धोनीसेनेचा प्रयत्न असणार आहे.