वडूज / प्रतिनिधी :
ओबीसी आरक्षण, बाजारबंदी उठवावी तसेच कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी या मागणीसाठी खटाव तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनीधी व कलाकारांनी आज वाद्यवृंदासह तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
सिध्दीविनायक मंदिरापासून मोर्चाला सुरूवात झाली. सनई, तुतारीच्या निनादात धान्य बाजारपेठ, हुतात्मा स्मारक, शेतकरी चौक, छत्रपती शिवाजी चौक, बस स्थानकमार्गे हा मोर्चा तहसिलदार कार्यालयावर धडकला. यावेळी डॉ. गुरव, प्रा. म्हेत्रे, डॉ. माने, धनाजी लवळे, महेश खडके यांनी तहसीलदारांसमोर कलाकारांच्या व्यथा मांडल्या.
खटाव तालुका सोशल फाऊंडेशनच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात वडगावचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, काँग्रेसचे माण मतदार संघ अध्यक्ष डॉ. महेश गुरव, राष्ट्रवादीचे माजी उपसभापती नाना पुजारी, प्रा. कविता म्हेत्रे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने आणि कलाकार संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.