सातारा व जावलीतील काही गावांचा समावेश
प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात जिल्हाधिकारी शेखर सिंह काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र जिल्हाधिकाऱयांनी जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने स्थिती जैसे थे ठेवली आहे. सातारा या कंटेनमेंट झोनमध्ये तसेच जावली तालुक्यातील 27 गावांसह मेढा नगरपंचायत क्षेत्रात किराणा साहित्य घरपोच पोहोचवण्यास सवलत दिली आहे. तर पाटणमधील काही गावांना सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत किराणा दुकाने व औषध दुकाने उघडी ठेवण्यास व घरपोच भाजीपाला पोहोचवण्यासाठी सवलत दिली आहे. तर कराडातील स्थिती पाहता कराड लॉकडाऊनच्या ठेवण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सातारा व जावली तालुक्यात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीप्रमाणे पुढील आदेश होईपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत किराणामालाचा पुरवठा करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्राप्त असलेल्या अधिकारानुसार सातारा नगरपरिषद क्षेत्रासह ग्रामपंचायत क्षेत्रात किरणा साहित्य घरपोच पुरविण्यास सुट दिली असून यामध्ये सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर व धनगरवाडी या ग्रामपंचायत क्षेत्रात व सातारा नगर पालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र या संपूर्ण क्षेत्राचा समावेश आहे.
तर जावली तालुक्यातील धनकवडी, निझरे, करंदी त. मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी त मेढा, जवळवाडी, म्हाते खुर्द, म्हाते बु., वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर त मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी ते मेढा, सावली ही गावे व मेढा नगर पंचायत क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील त्या प्रमाणे किरणा माल साहित्य घरपोच पुरविण्यात येतील.
जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्राप्त असलेल्या अधिकारानुसार पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, तळमावले, मल्हार पेठ, नाडे (नवा रस्ता), तारळे इत्यादी ग्रामपंचायतींना व नगरपंचायत पाटण या परिसराच्या नजीक असलेल्या कराड परिसरातील अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू ठेवण्यासाठी सुट देण्यात आली आहे. तसेच या क्षेत्रांमध्ये भाजीपाला घरपोच पुरविण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, पाटण ज्याप्रमाणे यंत्रणा उभारतील त्याप्रमाणे भाजीपाला घरपोच पुरविण्यात येईल.