कचरा हटवून लावली शोभेची झाडे
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील कचराकुंडय़ा हटवून कचरामुक्त शहर बनविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत महांतेशनगर सर्व्हिस रोड शेजारील कचरा हटवून ब्लॅक स्पॉट कायमचा हटविण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाने केला आहे. कचराकुंडीचे रूपडे बदलण्यात आले असून कचरा टाकू नये याकरिता याठिकाणी विविध प्रकारची शोभेची झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आले.
स्वच्छ बेळगाव, सुदंर शहर बनविण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. पण याकरिता शहरवासियांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. रस्त्याशेजारी कचरा टाकू नये, स्वच्छता कामगारांकडे कचरा देण्यात यावा, असे आवाहन दररोज महापालिकेकडून करण्यात येते. पण मनपाचे आवाहन ऐकण्यासाठी नागरिकांकडे वेळच नसतो, अशी स्थिती बेळगाव शहरात निर्माण झाली आहे. त्यामुळेच कचरा स्वच्छता कामगारांकडे देण्याऐवजी रस्त्याशेजारी टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. परिणामी रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. शहर आणि उपनगरांतील कचराकुंडय़ा हटवून स्वच्छ शहर बनविण्याचा प्रयत्न मनपाकडून केला जात आहे. पण हटविलेल्या कुंडीऐवजी नव्या ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे.
महापालिकेची गांधीगिरी
महांतेशनगर परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत असून कचरा टाकू नये, असे आवाहन करूनही नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेने गांधीगिरीचा उपक्रम राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सर्व्हिस रोडशेजारी साचलेल्या सर्व कचरा हटवून परिसर स्वच्छ करून याठिकाणी विविध प्रकारची शोभेची रोप लावण्यात आली. त्यामुळे कचराकुंडी बनलेल्या परिसराचे रूप बदलण्यात आले.
याची पाहणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांनी बुधवारी सकाळी पाहणी केली. यावेळी पर्यावरण साहाय्यक अभियंते आदीलखान पठाण व स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कामगार उपस्थित होते.