प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातल्या सर्व कचराकुंडय़ा सातारा पालिकेने हटवल्या गेल्या आहेत. मात्र जेथे पुर्वी कचरा कुंडय़ा होत्या तेथे कचरा पडण्याचे अजूनही बंद झालेले नाही. नित्यनियमाने वॉर्डात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडय़ा फिरत असतानाही कचरा रस्त्यावर पडला जातो. त्याचे फोटो काल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले अन् उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी ठेकेदारास दंड करण्याच्या सुचना करताच आरोग्य विभागाने दंड केला.
शहरात अनेक ठिकाणी आजही कचरा टाकला जातो. ओला आणि सुका कचरा एकत्र गोळा करुन नेला जात नाही अशा अनेक त्रुटी आरोग्य विभागाच्या जशा आहेत तशाच शहरातील काही खोडकर नागरिकांच्या आहेत. जातायेता पिशवीत, पोत्यात कचरा भरुन गाडीवरुन आडवळाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी कचरा टाकणारेही आहेत. या कचरा टाकणाऱयांमुळे शहरात दररोज सहा टन कचरा उचलला तरीही कचरा साठतोच. त्याचे फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याची दखल घेवून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी संबंधित ठेकेदाराने का कचरा उचलला नाही त्यावरुन दंड करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार त्या ठेकेदारास 2 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. नागरिकांनी शहरात कुठे कचरा पडलेला दिसल्यास थेट उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या व्हॉट्सऍपवर फोटो टाकावेत तो परिसर स्वच्छ करण्याबाबत आरोग्य विभागास सुचना दिल्या जातील, असे आवाहन त्यांनी केले आहे. सातारा विकास आघाडीकडून शहर स्वच्छतेचे काम नेटके आणि चांगले सुरु आहे, असेही उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले.