तेहरान-इराण / वृत्तसंस्था
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने गुरुवारी 2022 फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी आपले स्थान निश्चित केले. एएफसी आशियाई क्वॉलिफायर्स स्पर्धेतील अ गटातील लढतीत त्यांनी 1-0 अशा फरकाने विजय संपादन केला. ही लढत येथील अझादी स्टेडियमवर खेळवली गेली. मेहदी तरेमीने इराणचा सामन्यातील एकमेव गोल 48 व्या मिनिटाला नोंदवला.
दुसऱया सत्रात दोन्ही संघांनी उत्तम आक्रमणे रचली. मात्र, दोन्ही संघांचा बचाव देखील तितकाच भक्कम होता आणि यामुळे इराणची 1-0 ची आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. यापूर्वी, मागील नोव्हेंबर महिन्यात हॅरी केनने तब्बल 4 वेळा गोलजाळय़ाचे अचूक वेध घेतल्यानंतर इंग्लंडने सॅन मॅरिनोचा 10-0 असा एकतर्फी फडशा पाडत कतार वर्ल्डकपसाठी पात्रता निश्चित केली होती. शिवाय, त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये जर्मनीचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला होता. त्यावेळी युफा ग्रूप जे मध्ये नॉर्थ मॅसेडोनियाला नमवत त्यांनी पात्रता संपादन केली होती.
यंदाच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत 32 संघ परस्परांविरुद्ध भिडणार असून ही स्पर्धा दि. 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.