ड्रेनेज वाहिनीसाठी संपूर्ण रस्त्याची वाताहत : सततच्या खोदाईसत्रामुळे सर्वसामान्य प्रवाशांतून संताप व्यक्त
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध भागातील सांडपाण्याची समस्या निवारण्यासाठी नव्याने डेनेज वाहिन्या घालण्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विविध भागात रस्त्यांची खोदाई करून डेनेज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र, कपिलेश्वर रोड परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली असून गेल्या कित्येक महिन्यांपासून हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. परिणामी या परिसरातील रहिवाशांची आणि वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि शहरातील डेनेज वाहिन्या घालण्याचे काम अमृत योजनेंतर्गत करण्यात येत आहे. विविध भागात डेनेज वाहिन्या घालून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, कपिलेश्वर कॉलनी परिसरातून जाणाऱया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एसपीएम रोड ते धारवाड रोडला जोडणाऱया रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा रस्ता महत्त्वाचा आहे. पण ड्रेनेज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने संपूर्ण रस्त्याची वाताहत झाली आहे.
वाहनधारकांची होतेय गैरसोय
गेल्या दोन वर्षात या रस्त्याची अनेकवेळा खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. डेनेज वाहिन्या जोडणीसाठी कित्येक वेळा खोदाई करण्यात आली. त्यामुळे या रस्त्यावरून ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अलीकडे या रस्त्यावर मोठा खड्डा खोदण्यात आला असून, डेनेज वाहिनीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संताप
परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सातत्याने खोदाईसत्र करण्यात येत असल्याने व्यवसाय करणे मुश्किल बनले आहे. सदर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संताप व्यक्त करण्यात येत असून, हे काम आणखी किती वर्षे चालणार, असा मुद्दा सर्वसामान्यांतून उपस्थित करण्यात येत आहे. या परिसरातील रस्त्यांचे काम पूर्ण करून हा रस्ते वाहनधारकांसाठी खुले करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.