प्रतिनिधी /बेळगाव
दंतवैद्यकीय शाखेचा अभ्यास हा कौशल्याधारित अभ्यासक्रम आहे. त्यामुळे कौशल्य विकसित करत त्याचा दर्जा उंचावत नेणे हे दंतवैद्यांचे कर्तव्य आहे, असे विचार डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिबेंदू मुजुमदार यांनी व्यक्त केले.
केएलई हायर एज्युकेशन अँड रिसर्च व विश्वनाथ कत्ती दंतवैद्यकीय महाविद्यालयातर्फे इंडियन असोसिएशन ऑफ कॉन्झर्व्हेटिव्ह डेंट्रिस्टी अँड एंडोडोंट्रिक्सच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शनिवारी केएलई सेंटेनरी सभागृहात झालेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केएलई सोसायटीचे संचालक डॉ. व्ही. एस. साधुन्नावर होते. प्रमुख पाहुणे काहेर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी होते. व्यासपीठावर परिषदेचे सचिव डॉ. दीपक शर्मा व आयएसीडीईचे सचिव डॉ. प्रल्हाद सराफ होते.
डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया पुढील वर्षापासून डिजिटल पोर्टल सुरू करत आहे. त्याचा देशातील सर्व दंत महाविद्यालयांना लाभ होईल, अशी घोषणा डॉ. दिबेंदू यांनी यावेळी केली.
या परिषदेत एक हजार विद्यार्थी आणि 300 प्रतिनिधींनी भाग घेतला. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी ही परिषद झाली. केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद झाली.
डॉ. सोनल जोशी यांनी स्वागत केले. डॉ. नेहा धडेद व डॉ. आदित्य आचार्य यांनी सूत्रसंचालन केले. सचिव डॉ. प्रीती दोडवाड यांनी आभार मानले. या परिषदेला प्राचार्या डॉ. अलका काळे, डॉ. आनंद पाटील यांचे सहकार्य लाभले.