वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीबीआयने नौदलातील कमांडर जगदीश यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. कमांडर जगदीश यांना नौदलाशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 6 आरोपींच्या विरोधात पूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर कमांडर जगदीश यांच्या विरोधातील तपास अद्याप सुरू असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱयांनी बुधवारी सांगितले.
सीबीआयने 2 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त नौसैनिक अधिकारी कमोडोर रणदीप सिंह आणि कमांडर सतविंदर जीत सिंह यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. तर 31 जुलै रोजी स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेण्यापूर्वी पाणबुडी अधिग्रहण निदेशालयात काम करत असताना कमांडर एस. जे. सिंह यांनी आर्थिक लाभाच्या बदल्यात रणदीप सिंह यांना अंतर्गत विचारविनिमयाची नियमित माहिती पुरविल्याचा आरोप आहे.