डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय व अन्य कर्मचाऱयांकडून निरंतर सेवा, संयमी वृत्तीला दाद देण्याची गरज
प्रसाद नागवेकर / मडगाव
कोविड संसर्गित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेवर भरपूर ताण पडला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थापनात सरकार कमी पडत असल्याची टीका वारंवार होत आहे. मात्र वाढत्या रुग्णांची देखभाल करण्याऱया डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच रुग्णव?ाहिका कर्मचारी यांच्याकडून अहोरात्र सुरू असलेल्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नसून रुग्णांची सेवा करण्यासाठी ते झटत असल्याचे चित्र इस्पितळांतून अनुभवण्यास मिळत आहे.
मडगाव शहरातच संसर्गित रुग्णांची संख्या 2133 च्या घरात गेली असून एकंदर सासष्टी तालुक्मयातील रुग्णसंख्या 4 हजारांच्या वर पोहोचली आहे. मागील सलग दोन दिवसांत राज्यात 3 हजारांहून जास्त बाधित आढळून आल्याने एकंदर सक्रिय रुग्णसंख्या 22945 झाली आहे. मडगावात सर्वांत जास्त सक्रिय रुग्ण असल्याने हा परिसर कोविड हॉटस्पॉट बनला आहे.
बहुतांश रुग्ण घरी विलगीकरणात राहत असले, तरी स्थिती बिघडल्यावर इस्पितळात धाव घेण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे सरकारी इस्पितळे कोविड रुग्णांनी भरून गेली आहेत. रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याने खासगी इस्पितळांत धाव घेण्याचे प्रकार वाढले असून खासगी इस्पितळांत आता जागा शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्यावर आरोग्य सुविधांत वाढ करण्यात अपयश आल्याची टीका राजकारणी व अन्य लोकांकडून होऊ लागली आहे.
डॉक्टर, कर्मचाऱयांकडून अहोरात्र प्रयत्न
दुसरीकडे उपलब्ध असलेल्या सुविधा वापरून सरकारी इस्पितळांतील डॉक्टर व कर्मचारी रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे दिसून येते. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका कर्मचारी आपआपल्या परीने प्रयत्न करत असून वेळेवर जेवण व झोप घेणे त्यांना शक्मय होत नाही. त्यातच हे कर्मचारी रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांनाही बाधित होण्याची भीती भेडसावत असते. काही डॉक्टर व कर्मचारी बाधितही झाले आहेत.
सध्या इस्पितळांत कोविड चाचण्यांसाठी गर्दी होत असल्याने तपासणी करणारे कर्मचारी व तंत्रज्ञ यांच्यावर ताण पडत आहे. रुग्णांना घेऊन येणारे प्रत्येक नातेवाईक आपल्या रुग्णांना तपासण्यास विलंब झाल्यास सुरक्षा रक्षकांवर आपला राग काढत असतात. असे प्रकार जिल्हा इस्पितळात आता नित्याचेच बनू लागले आहेत. अशा परिस्थितीतही काम करताना डॉक्टर व आरोग्य कर्मचारी दाखवत असलेल्या संयमी वृत्तीला दाद देण्याची गरज व्यक्त होत आहे.