पालिका कर्मचाऱयांनीच केले कचरा संकलन, नियोजन सभापतींनी केला समेट
प्रतिनिधी/ कराड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा साधनांची मागणी कचरा संकलन करणाऱया घंटागाडीच्या चालकांनी ठेकेदाराकडे केली होती. मात्र ती ठेकेदाराने पूर्ण न केल्याने चालकांसह 44 जणांनी संप पुकारला. त्यामुळे मंगळवारी शहरात खळबळ उडाली. मात्र पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांनी स्वत:च घंटागाडय़ा चालवत कचरा संकलन केले. त्यानंतर नियोजन सभापतींनी मध्यस्ती करत समेट घडवला.
नगरपालिकेतर्फे 18 घंटागाडय़ा शहरात कचरा संकलन करतात. याचा ठेका देण्यात आला आहे. 18 गाडय़ांवर चालक व साहाय्यक असे एकुण 44 जण आहेत. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉश तसेच विमा संरक्षण अशा विविध मागण्या केल्या होत्या. त्या पूर्ण करण्यास ठेकेदाराने नकार दिल्याने आज सकाळपासून चालकांनी संप सुरू केला. शहरात सकाळी गाण्यांच्या आवाजाबरोबर ओला आणि सुका कचरा संकलन करण्याची सवय आता नागरिक आणि महिलांना झाली आहे. परंतु सकाळी घंटागाडीच न आल्याने विचारणा सुरू झाली. त्यानंतर पालिका स्तरावर धावाधाव सुरू झाली. मुख्याधिकारी यशवंत डांगे तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी आरोग्य कर्मचाऱयांनाच गाडय़ा चालवण्याचे आदेश दिले. या कर्मचाऱयांनी गाडय़ा घेऊन कचरा संकलन केले.
नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी ठेकेदार आणि कर्मचाऱयांची पालिकेत बैठक घेत समेट घडवून आणला. दरम्यान, या प्रकरणी ठेकेदारास दंड करणार असल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.