मलकापूर नगराध्यक्षांची महामार्ग पोलीस, कराड शहर वाहतूक शाखेकडे मागणी
कराड / प्रतिनिधी :
कराड, मलकापूरसह आशियाई मार्गावर कराड हद्दीत गत तीन महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भरधाव वेगाने वाहने चालवून अनेक चालक स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन करतील अशा वाहनांवर कडक कारवाई करावी. या कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवावे अशी मागणी मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा नीलम धनंजय येडगे यांनी केली.
नगराध्यक्षा येडगे यांनी बुधवारी महामार्ग पोलीस केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक अस्मिता पाटील व कराड शहर वाहतूक शाखेच्या सरोजनी पाटील यांची भेट घेतली. मलकापूर शहरातून आशियाई मार्ग जात असल्याने अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांबाबत त्यांनी पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. याप्रसंगी नगरसेविका आनंदी शिंदे, नगरसेविका गितांजली पाटील यांची उपस्थिती होती.
नगराध्यक्षा निलम येडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड उपविभागात आशियाई मार्गावर डिसेंबर 2020 व जानेवारी 2021 या महिन्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 31 जानेवारी रोजी पाचवड फाटा येथे भीषण अपघातात तीन युवकांना जीव गमवावा लागला. तर 7 फेब्रुवारी रोजी रविवारी वहागांव येथे स्विफ्टच्या अपघातात चारजण ठार झाले. मलकापूर शहरातून आशियाई मार्ग जातो. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी वेगाचे नियम मोडणारे वाहनांवर कडक कारवाईची मोहिम सुरू करावी. कारवाईच्या मोहिमेत आपण सातत्य ठेवल्यास नक्कीच अपघातांवर नियंत्रण येण्यास मदत होईल.