बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना साथीचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे नऊ महिने बंद राहिलेली कर्नाटकातील सर्व वैद्यकीय आणि पॅरामेडिकल महाविद्यालये मंगळवारी पुन्हा उघडली. डेंटल, आयुष, पॅरामेडिकल, नर्सिंग आणि फार्मसी महाविद्यालयांनीही कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आजपासून नियमित वर्ग सुरू केले आहेत.
कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के सुधाकर यांनी १ डिसेंबरपासून वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले होते.
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स वापरणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आल्या आहेत. प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वर्गांना उपस्थित राहण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी करून नकारात्मक अहवाल घेऊन येण्यास सांगितले गेले आहे.