बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शुक्रवारी १,००५ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर राज्यातील विविध जिल्ह्यातून १,१०२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात शुक्रवारी ५ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान अर्जात सध्या १३,५०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत १२,०४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर जिल्ह्यात बाधितांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ५७८ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्याच वेळी बेंगळूरमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ८,८१९ झाली. दरम्यान शुक्रवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ६०० रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. तर कोरोना संक्रमित चौघांचा मृत्यू झाला. यासह, शहरात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,२८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.