बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा वेग कमी झाला आहे. हळूहळू राज्यातील परिस्थिती मार्गावर आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्थांना पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती सरकारने शुक्रवारी दिली.
प्रधान आयुक्त (महसूल) एन. मंजुनाथ प्रसाद यांनी आपल्या आदेशात सांगितले की, आयुष, नर्सिंग महाविद्यालये आणि इतर संबंधित आरोग्य सेवा शैक्षणिक संस्था, महाविद्यालये संबंधित वैद्यकीय, दंत महाविद्यालये, महाविद्यालये आणि संस्था यांना पुन्हा वर्ग सुरू करण्याची परवानगी आहे.
तसेच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शुक्रवारी ट्वीट करून, “राज्यातील सर्व वैद्यकीय, दंत, आयुष आणि इतर संबंधित आरोग्य सेवा शैक्षणिक संस्था तातडीने पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली.
दरम्यान, कोरोना लसीचा कमीतकमी एक डोस घेतलेले विद्यार्थी, अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास परवानगी देण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच संस्थांनी कोविड नियमांचे वर्तनाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हंटले आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्यांना लसीकरण केल्यानंतर उच्च शिक्षण संस्था सुरु केल्या जातील असे म्हंटले होते.