रस्त्यावर चित्रे विकून करतोय गुजराण
सोशल मीडियावर एका अशा पित्याची कथा व्हायरल होत आहे, ज्याच्या मुलांनी त्याला वणवण भटकण्यासाठी वाऱयावर सोडून दिले आहे. आता हा पिता दोनवेळच्या जेवणासाठी रस्त्याच्या कडेला चित्रं विकतो. पण कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या या काळात एकवेळचे जेवण मिळविणेही त्यांच्यासाठी अवघड ठरले आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने या वृद्ध कलाकाराची कहाणी इंटरनेटवर शेअर करत लोकांना अधिकाधिक संख्येत त्यांची चित्रे विकत घेण्याचे आवाहन केले आहे.
चित्रकार सुनील पाल कोलकात्यातील गोल पार्क येथे स्वतःच्या अद्भूत कलाकृतींसह बसतात. त्यांच्या मुलांनी त्यांना आसरा नाकारला आहे. याचमुळे जगण्यासाठी ते चित्रे तयार करून ती 50-100 रुपयांमध्ये विकत आहेत. सद्यकाळात पोट भरणेही अवघड ठरले आहे. सुनील यांचे वय आता 80 वर्षे आहे.
या ट्विटला आतापर्यंत 16 हजारांहून अधिक लाइक्स आणि 6 हजारांहून अधिक रीट्विट मिळाले आहेत. तसेच शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.