अध्यक्ष निवडणुकीची तारीख ठरण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्याशी संबंधित तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पक्षाध्यक्ष निवडणुकीच्या तारीख जाहीर केल्या जाऊ शकतात.
सोनिया गांधी या बैठकीत व्हर्च्युअली स्वरुपात सामील होऊन याचे अध्यक्षत्व करणार आहेत. सोनिया गांधी सध्या वैद्यकीय तपासणीसाठी विदेश दौऱयावर असून राहुल गांधी अन् प्रियांका वड्रा देखील त्यांच्यासोबत आहेत. आज होणाऱया कार्यकारिणी समितीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा निश्चित करण्याचा एकमात्र मुद्दा आहे. परंतु यात आता आझाद यांच्या राजीनाम्यासंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीच्या तारखेला मंजुरी देण्यासाठी कार्यकारिणी समितीची बैठक रविवारी दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विट करत दिली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया टाळली होती. पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार असल्याची घोषणा काँग्रेसने मागील वर्षी केली होती. काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीला काही आठवडय़ांचा विलंब होण्याची शक्यता आहे, कारण पक्षाने सध्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आयोजित केल्या जाणाऱया ‘भारत जोडो यात्रे’वर लक्ष केंद्रीत केले असून ही यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष होण्यास नकार दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक नेत्यांकडून जाहीरपणे राहुल यांना पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन केले जात आहे, तर राहुल गांधी हे पक्षाध्यक्ष न होण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सलग दुसऱयांदा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यावर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.