यवतेश्वर परिसरातील हॉटेलवर पोलिसांचा छापा
प्रतिनिधी/ सातारा
पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या कास रोडवरील यवतेश्वर येथील एका रिसॉर्टवर तालुका पोलिसांनी शुक्रवार रात्री उशिरा छापा टाकला. यामध्ये कॉलगर्ल्स पुरविणाऱया एकाला ताब्यात घेतले आहे. गणेश हणमंत धनावडे (रा. साईबाबामंदीर जवळ गोडोली सातारा) असे त्याचे नाव आहे. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यवतेश्वर-कास या ठिकाणी असणाऱया अनेक हॉटेल, रिर्साट मालकांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. यात त्यांनी केलेले अतिक्रमण हा नेहमी चर्चेचा विषय असतो. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या हॉटेल, रिर्साट मालकांचा मनमानी कारभार वाढत चालला आहे. असा गलथान कारभार शुक्रवारी रात्री उघडकीस आला. यवतेश्वर येथील एका रिर्साटवर अवैध धंदे चालू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजीत घाडके यांना मिळाली. त्यांनी रिर्साटवर छापा टाकला. यावेळी येथे देहविक्री व्यवसायासाठी गणेश धनावडे याने दोन महिलांना आणले होते. या महिलांची सुटका करण्यात आली असून गणेश धनावडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलिस प्रमुखांनी कास पठारावरील त्या बेकायदेशीर हॉटेलवर तपासणी करून कारवाई करावी, तसेच जे हॉटेल धारक गैरप्रकार करत असतील त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.