वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानात प्रेक्षकांच्या एका स्टँडला माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचे नाव दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेने दिले होते. दरम्यान या स्टँडवर लिहिण्यात आलेले आपले नाव त्वरित काढा, अन्यथा आपण दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेविरूद्ध कायदेशीर कारवाई करू, असा इशारा माजी कर्णधार बेदी यांनी दिला आहे.
कोटला मैदानामध्ये दिल्ली क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच केंद्रीय अर्थमंत्री दिवंगत अरूण जेटली यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्या विरोधात बेदी यांनी यापूर्वी दिल्ली क्रिकेट संघटनेला एक पत्र पाठविले होते पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने बेदी यांनी आणखी एक पत्र दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांना पाठविले आहे. त्यात त्यांनी वरील इशारा दिला आहे.