वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील खेळाच्या दुसऱया दिवशी श्रीलंकेने यजमान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या डावात 396 धावा जमविल्या. त्यानंतर त्यानंतर यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाला दमदार सुरूवात करताना चहापानापर्यंत 38 षटकांत 1 बाद 180 धावा जमविल्या होत्या. रविवारी लंकन संघाला आणखी एका दुखापतग्रस्त खेळाडूचा फटका बसला.
लंकेने 6 बाद 340 या धावसंख्येवरून रविवारी दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे चार गडी 56 धावांत बाद झाले. लंकेचा पहिला डाव 96 षटकांत 396 धावांवर आटोपला. लंकेच्या पहिल्या डावात दिनेश चंडीमलने 11 चौकारांसह 85, धनजय डिसिल्वाने 1 षटकार आणि 11 चौकारांसह 79, शनाकाने 5 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 66, डिक्वेलाने 6 चौकारांसह 49, कर्णधार करूणारत्नेने 4 चौकारांसह 22, हसरंगाने 3 चौकारांसह 18, कुशल परेराने 2 चौकारांसह 16, कुशल मेंडीसने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या, दक्षिण आफ्रिकेतर्फे सिपम्लाने 76 धावांत 4, मुल्डेरने 69 धावांत 3 तर एन्गिडी आणि नॉर्त्जे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दक्षिण आफ्रिकेतील श्रीलंकेची कसोटी क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी म्हणजे 2011-12 दरम्यान केपटाऊनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात लंकेने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 342 धावा जमविल्या होत्या. या पहिल्या कसोटीत लंकेचा डाव संपल्यानंतर यजमान दक्षिण आफ्रिकेने चहापानास खेळ थांबला तेव्हा 38 षटकांत 1 बाद 180 धावा जमविल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी एल्गार आणि मार्करम यांनी 141 धावांची शतकी भागिदारी केली. फर्नांडोने मार्करमला झेलबाद केले. त्याने 14 चौकारांसह 68 धावा जमविल्या. एल्गार 14 चौकारांसह 86 धावांवर तर डय़ुसेन 1 चौकारांसह 8 धावांवर खेळत आहे. या कसोटीतील रविवारी खेळाच्या दुसऱया दिवशी लंकेचा वेगवान गोलंदाज रजिता जखमी झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. पहिल्या दिवशी धनंजय डिसिल्वा जखमी झाला होता. तो या मालिकेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव 96 षटकांत सर्वबाद 396 (चंडीमल 85, डिसिल्वा 79. शेनका बाद 66, डिक्वेला 49, करूणारत्ने 22, कुशल परेरा 16, मेंडीस 12, हसरंगा 18, सिपम्ला 4-76, मुल्डेर 3-69, एन्गिडी, नॉर्त्जे प्रत्येकी 1 बळी).
दक्षिण आफ्रिका प. डाव- 38 षटकांत 1 बाद 180 (एल्गार खेळत आहे 86, मार्करेम 68 डय़ुसेन खेळत आहे 8, फर्नांडो 1-36).
(धावफलक चहापानापर्यंत)