पर्यटन व्यावसायिकांची चिंता दूर, पर्यटन हंगाम संपेपर्यंत फेऱया सुरु राहाणार
प्रतिनिधी /वास्को
एनसीबीच्या छाप्यामुळे वादात सापडलेल्या पर्यटक क्रूझ जहाज कार्डियला इम्प्रेस या जहाजाचे काल रविवारी सकाळी पुन्हा गोव्यात आगमन झाले. 1105 पर्यटकांसह हे जहाज दुसऱयांदा मुरगाव बंदरात दाखल झाले. संध्याकाळी हे जहाज 254 अतिरिक्त प्रवाशांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले. हे जहाज पुन्हा दाखल झाल्याने पर्यटक व्यवसायिकांची चिंता दूर झाली आहे.
गोव्याचा चार्टर पर्यटन हंगाम अधिकृतरित्या प्रारंभ होण्यापूर्वीच सप्टेंबरच्या अखेरीस हे जहाज प्रथमच गोव्यात आले होते. पर्यटन हंगामात हे जहाज एकूण 58 वेळा गोव्याला पर्यटकांसह भेट देणार असून पहिल्या फेरीनंतर दुसरी फेरी घेऊन गोव्यात दाखल होण्याच्या वाटेवर असतानाच 3 ऑक्टोबरला या जहाजावर एनसीबीचा छापा पडला होता. या जहाजात चाललेल्या पार्टीत अमलीपदार्थाचा वापर झाल्याचे दिसून आल्याने एनसीबीने सीनेस्टार शाहरूख खानचा पुत्र आर्यन खान याच्यासह काही जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात कार्डियला इम्प्रॅस या जहाजालाही चौकशीला सामोरे जावे लागले होते. सदर प्रकरण अद्याप थंडावलेले नाही. आर्यन खान अद्यापही कोठडीत आहे. अमलीपदार्थांच्या पार्टीत या जहाजाचे नाव गोवले गेल्याने या जहाजाच्या गोव्यात होणाऱया 58 फेऱयांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पर्यटनाशी निगडीत अनेकांचे व्यवसाय या जहाजावर अवलंबून होते. त्यामुळे चिंता होती. अखेर हे जहाज आपली दुसरी फेरी घेऊन रविवारी मुरगाव बंदरात दाखल झाल्याने चिंता मिटली आहे. हे जहाज 1105 पर्यंकांना घेऊन दाखल झाल्याचे समजताच स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले. पर्यटकांनी दिवसभरात गोवा दर्शन करून संध्याकाळी हे जहाज पुन्हा मुंबईला रवाना झाले. मुरगाव बंदरात 254 प्रवाशांनी या जहाजांमध्ये प्रवेश केला. आता पर्यटक हंगाम संपेपर्यंत या जहाजाच्या फेऱया बंदरात होत राहतील.