प्रतिनिधी /पणजी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी फी महागली असून ती 2021 करीता रु. 1180 एवढी करण्यात आली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम चित्रपट महोत्सवाच्या फीवरही झाला आहे. त्यामुळे अनेकांनी खंत प्रकट केली असून नोंदणी फी ऑनलाईन भरायची असल्याने कमी होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जीएसटीमुळे नोंदणी फी वाढल्याचे सांगण्यात आले.
कोरोना महामारीमुळे खरे म्हणजे नोंदणी फी कमी करायला हवी होती. परंतु चित्रपट उद्योग मंदीत असल्यामुळे सदर फी वाढवण्यात आली असल्याची माहिती गोवा मनोरंजन सोसायटीच्या सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी फी रु. 1000 होती तर तत्पूर्वीच्यावर्षी ती रु. 300 होती म्हणजे दरवर्षी नोंदणी फीमध्ये वाढ होत असून खर्च वाढत असल्याने फी वाढवावी लागत असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.
आगामी महिन्यात 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा आंतरराष्ट्रीय चित्रपट पणजीत होणार असून त्याची पूर्वतयारी सध्या चालू आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे हा महोत्सव पुढे ढकलून जानेवारी 2021 मध्ये घेण्यात आला होता. यंदा मात्र तो ठरलेल्या कालावधीत घेण्याचे ठरवण्यात आले आहे.