सीरियातील दहशतवाद्यांना पाठविण्याच्या तयारीत : पाकधार्जिणा तुर्कस्तान प्रत्येकाला 1.5 लाख रुपये देणार
वृत्तसंस्था/ इस्तंबूल
पाकिस्ताननंतर आता तुर्कस्तानही काश्मीरमध्ये दहशतवादाला बळ पुरविण्याचा प्रयत्न करू लागल्याचे समोर आले आहे. सीरियात लढत असलेल्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठविण्याची योजना तुर्कस्तान आखत असल्याचे वृत्त आहे. तुर्कस्तानच्या शासकीय प्रसारमाध्यम संस्थेनेही पाकिस्तान आणि काश्मीर प्रकरणी टिप्पणी केली आहे. काश्मीर मुद्दय़ाला अजरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील नागोर्नो-काराबाख वादाप्रमाणे ठरविण्याची आगळीक तुर्कस्तानने केली आहे. तुर्कस्तानच्या मदतीने दोन आठवडय़ांपूर्वीच अजरबैजानने या भागावर कब्जा केला आहे.
तुर्कस्तानची वृत्तसंस्था एएनएफ न्यूजने काश्मीर मुद्दय़ावर एक अहवाल प्रकाशित केला आहे. यानुसार सीरियात तुर्कस्तानपुरस्कृत सुलेमान शाह ब्रिगेड नावाची दहशतवादी संघटना कार्यरत आहे. या संघटनेला सीरियाच्या नॅशनल आर्मीचा हिस्सा म्हटले जाते. याचे नेतृत्व करणाऱया अबू एमशाने 5 दिवसांपूर्वीच स्वतःच्या दहशतवाद्यांना तुर्कस्तान आता काश्मीरप्रकरणी पाकिस्तानची मदत करू पाहत असल्याची माहिती दिली आहे.
दहशतवाद्यांच्या भरतीसाठी मोहीम
एमशा याच्यानुसार तुर्कस्तानचे अधिकारी लवकरच काश्मीरमध्ये जाऊ पाहणाऱया दहशतवाद्यांची यादी मागणार आहेत. या सर्व दहशतवाद्यांना प्रत्येकी 2 हजार अमेरिकन डॉलर्स (सुमारे 1.5 लाख रुपये) दिले जाणार आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठविण्यासाठी एजाज, जाराब्लस, अल-बाब, अफरीन आणि इदलिब भागात तुर्कस्तान मोहीम चालवत आहे. दहशतवाद्यांना एका गटात गुपचूपपणे काश्मीरमध्ये पाठविण्याचा कट असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तान-तुर्कस्तान सख्य
काश्मीर प्रकरणी तुर्कस्तान पाकिस्तानची पाठराखण करत आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघासह अन्य जागतिक व्यासपीठांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यास त्याने पाकिस्तानची मदत केली आहे. मागील वर्षी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत तुर्कस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. भारताने तुर्कस्तानला याप्रकरणी चांगलेच सुनावले होते. उत्तरपूर्व सीरियावर कब्जा करण्याच्या तुर्कस्तानच्या प्रयत्नांचे पाकिस्तानही समर्थन करत आहे.
एर्दोगान यांची आसुरी महत्त्वाकांक्षा
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान मुस्लीम जगताचे म्होरके होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. इस्लामिक जगतावरील सौदी अरेबियाच्या प्रभुत्वाला आव्हान देण्यासाठी एर्दोगान अनेक चिथावणीखोर पावले उचलत आहेत. तुर्कस्तान आणि पाकिस्तान संरक्षण सहकार्य वाढवून अन्य देशांची भूमी बळकावू पाहत आहेत. अलिकडेच शील्ड ऑफ मेडेटेरियन युद्धाभ्यासादरम्यान पाकिस्तानी लढाऊ विमाने तुर्कस्तानात पोहोचली होती. एर्दोगान पाकिस्तानच्या मदतीने ग्रीसच्या भूमीवर कब्जा करू पाहत आहेत. याचमुळे ते काश्मीर मुद्दय़ावर पाकिस्तानच्या सहाय्यासाठी दहशतवाद्यांना पाठविण्याचा कट रचत आहेत.