रशियाच्या सैनिकांसाठी ठरला काळ
रशिया आणि युक्रेनकडून सातत्याने परस्परांना प्रचंड नुकसान पोहोचविण्याचे दावे केले जात आहेत. याचदरम्यान ‘कीव्हच्या भूता’ (घोस्ट ऑफ कीव्ह)वरून चर्चा रंगली आहे. हे भूत प्रत्यक्षात युक्रेनचा शूर मिग-29 फुलक्रम फायटर पायलट (लढाऊ वैमानिक) असून ज्याला युक्रेनचे नागरिक स्वतःचा ‘नायक’ मानत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून या वैमानिकाने रशियाच्या ताफ्याचा मोठा विध्वंस घडवून आणला असून आतापर्यंत 6 विमानांना नष्ट केले आहे.
एका एकटय़ा युक्रेनियन वैमानिकाने दिवसा उजेडात साहसी उड्डाण करत रशियाला नुकसान पोहोचविले आहे. युद्धाच्या वातावरणात अशाप्रकारच्या कहाण्या काल्पनिक वाटू लागतात. परंतु अनेक प्रसारमाध्यमांकडून या ‘भूता’संबंधी दावे केले जात आहेत. युक्रेनचे पत्रकार क्रिस्टोफर मिलर यांनी एक व्हिडिओ ट्विट करत ‘दोन युक्रेनियन विमानांना कीव्हच्या दिशेने जाताना आणि परत येताना पाहिले, हे त्यातील एक आहे. हे भूत असू शकते का’ असे नमूद केले आहे.
6 रशियन विमान पाडविली
एका युक्रेनियन वैमानिकाने रशियाच्या 6 विमानांना पाडविले आहे. या वैमानिकाला ‘कीव्हचा भूत’ म्हणून ओळखले जात असून त्याच्या मिग-29 विमानाला आज अनेक व्हिडिओंमध्ये पाहिले गेल्याचे’’ पत्रकार मिलर यांनी म्हटले आहे.
युक्रेनचा दावा
रशियाची दोन सुखोई-35 विमाने, एक आयएल-76 वाहतूक विमान आणि एक हेलिकॉप्टर नष्ट केल्याचा दावा युक्रेनने शनिवारी केला आहे. आयएल-76 वाहतूक विमानातून रशियाचे पॅराट्रूपर्स प्रवास करत होते अशी माहिती युक्रेनच्या सैन्याने दिली आहे. आतापर्यंत 1 हजाराहून अधिक रशियाच्या सैनिकांना ठार केल्याचा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे.