म्हापसा आयआरबी पोलीस शिपायाचा प्रतापः दंडाची रक्कम पैसे वैयक्तिक खात्यात भरायला लावले
प्रतिनिधी /म्हापसा
कुंपणच जेव्हा शेत खाते… अशी घटना म्हापसा पोलीस स्थानकातील आयआरबी पोलिसांकडून म्हापसा गांधीचौकात काल रात्री घडली. विशेष म्हणजे दुचाकी चालकास दंड दिल्यावर पोलीस शिपाई आत्माराम आरोसकर याने दंडाचे पैसे आपल्या वैयक्तिक खात्यात गुगल पेद्वारे भरण्यास लावल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ माजली. अशा लाचखोर शिपायाला निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असून म्हापसा पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 8.3 वाजता काळात काणका बांध येथील दिगंबर नारायण आमोणकर यांना हेल्मेट परिधान न केल्याच्या कारणावरून अडविले व त्याच्याजवळ परवाना मागितला असता आमोणकर यांनी त्यांना परवाना दाखविला. आपल्याजवळ पैसे नसल्याने आपण जीपे करतो असे पोलीस आरोसकर याला सांगितले, असता त्याने आमोणकर यांना आपला वैयक्तिक जीपे नंबर दिला. व तेथे दंडाचे 100 रुपये भरण्यास सांगितले. आमोणकर याने जीपेद्वारे आरोसकर यांच्या बँक खात्यावर पैसे दिल्यावर त्यांना दंडाचे चलन देऊन त्यांना पाठवले. मात्र घरी आल्यावर आमोणकर यांनी स्लीप पाहिली असता ती अन्य कुणाची होती. त्यावर त्यांनी एका वृत्तवाहिनी काम करणाऱया भावोजींना घटनेची माहिती दिली, व नंतर याची माहिती त्वरित म्हापसा पोलिसांना दिली.
याप्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्यापर्यंत हे प्रकरण नेले आहे. तेथे शिपाई आपल्या वैयक्तिक नावावर दंडाची रक्कम स्विकारू शकत नसल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस शिपायाला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक लोटलीकर यांनी दिली.
संबंधित पोलीस शीपायाला निलंबित करा!
समाजाचे रक्षक असलेले पोलिसच अशी गैरकृत्ये करू लागली तर सामान्य नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न म्हापशातील नागरिक तथा म्हापसा बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गृहखात्यात पोलीस वर्ग चांगले कार्य करीत असल्याचे म्हणत आहे मात्र या प्रकरणाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून अशा लाचखोर पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी बर्डे यांनी केली आहे.