वीजमंत्र्यांच्या आणखी एका गैरकृत्याचा आपकडून पर्दाफाश
प्रतिनिधी /पणजी
केवळ पाचच वर्षात स्वतःच्या संपत्तीत नऊ लाखांवरून तीन कोटीपर्यंत वाढ करणाऱया वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या संपत्तीचा पर्दाफाश केल्यानंतर आप नेते ऍड. अमित पालेकर यांनी काब्राल यांच्या कुडचडेतील बेकायदेशीर मालमत्तेचा गौप्यस्फोट केला आहे. यावरून भाजपच्या विकास मॉडेलमध्ये ’मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ आणि सामान्य गोमंतकीयांच्या संपत्तीत घट’ झाल्याचे सिद्ध होत आहे, असे पालेकर यांनी सांगितले.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोमंतकीयांना मोफत वीज देणे परवडणारे नाही, असे वारंवार सांगणारे वीजमंत्री स्वतः मात्र आपल्या मालमत्ता वाढविण्यात व्यस्त होते, असा दावा पालेकर यांनी केला.
कोरोनाचा प्रताप : मतदार गरीब, आमदार गब्बर
पालेकर यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या दरम्यान बहुतेक गोमंतकीयांचे उत्पन्नाचे स्रोत बुडाले, नोकऱया गेल्या, गरीबीत दिवस काढण्याची वेळ आली. अनेकांना त्यांच्या मालमत्ता विकण्यास भाग पाडले, तर दुसऱया बाजूने सरकार मात्र मर्जीतील काही खास व्यक्तींसाठी गुपचूप श्रीमंत होण्याचे कार्यक्रम राबवत होते, त्यात काब्राल हे ’स्टार लाभार्थी’ असल्याचा असा आरोप पालेकर यांनी केला.
नीलेश काब्राल गेट रिच कार्यक्रमाचे स्टार आहेत. पाच वर्षांपूर्वी, ते दरमहा एक लाखापेक्षा कमी कमावत होते. सध्या, काब्रालचे उत्पन्न 25 पटीने वाढले आहे. ते आता महिन्याला 25 लाखांहून अधिक कमावतात, जे वार्षिक 3 कोटींहून अधिक आहे. हे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात कबूल केले आहे, असे पालेकर पुढे म्हणाले.
कुडचडेत काब्राल यांची बेकायदेशीर मालमत्ता
कुडचडेत काब्राल यांच्या बेकायदेशीर मालमत्तेकडे लक्ष वेधताना पालेकर यांनी, काब्राल यांच्या प्रतिज्ञापत्रात दावा केलेल्या संपत्तीपेक्षा बेकायदेशीर मालमत्तेची किंमत लक्षणीय आहे. शिवाय, ही मालमत्ता एका संवेदनशील झोनमध्ये आहे असा आरोप केला.
दिल्लीतील 70 टक्क्यांपेक्षा जास्त घरांमध्ये आता वीज बिल नाही. आम नागरिकांच्या कल्याणासाठी आम आदमी पक्षाने पैसा खर्च केला. आपचे नेते लोकांसाठी काम करत आहेत. आप हा भारतातील एकमेव असा पक्ष आहे जो भ्रष्टाचारमुक्त असल्याचा अभिमानाने दावा करू शकतो. हे प्रमाणपत्र आम्हाला इतर कोणीही नाही तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. त्यांनी आमच्या मंत्री आणि नेत्यांच्या मागे सर्व एजन्सी (सीबीआय, ईडी इत्यादी) पाठवल्या. दिल्लीच्या उर्जामंत्र्यांच्या घराप्रमाणेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. त्यांनी आमचे सर्व रेकॉर्ड तपासले आणि कुठेही दोष आढळला नाही, असे ते पुढे म्हणाले.
प्रशासकीय किंवा प्रशासन कौशल्य नसलेल्या राजकारण्यांची निव्वळ अक्षमता पाहून एक गोमंतकीय म्हणवून घेण्यात मला शरम वाटते. आम्हाला यातून सुटका करावी लागेल. अशावेळी स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीत तब्बल 25 पट वाढ करणाऱया उमेदवाराला निवडायचे की गोवा आणि गोव्याचा 25 पट विकास करणाऱया व्यक्तीला विजयी करायचे त्यासंबंधी निर्णय आता मतदारांनीच घ्यावा, असे आवाहन पालेकर यांनी केले.
आपचे कुडचडेचे उमेदवार गॅब्रिएल फर्नांडिस म्हणाले, ’गोयांत कोळसो नाका’ मध्ये माझा सहभाग असल्याच्या संदर्भात, काब्राल यांनी माझ्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. मग काब्रालने असंख्य झाडे तोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.