प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी येथील गेट नं.३८ वरील उड्डाणपुलाबाबत राज्यशासन तयार असेल उड्डाणपूल देण्याला कोणतीच हरकत नसल्याचे मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक संजीव मित्तल यांनी कुर्डुवाडी येथे वार्षिक परिक्षण भेटी दरम्यान सांगितले. परिक्षणानंतर कुर्डुवाडी स्थानकाबाबत समाधान व्यक्त करत दहा हजारांचे पारितोषिक मित्तल यांनी जाहीर केले. तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. यावेळी खा.रणजितसिंह नाईकनिंबाळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख सोलापुर विभागीय रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता, स्टेशन प्रबंधक आर डी चौधरी आदी उपस्थित होते.
शुक्रवार दि.१८ रोजी मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक संजीव मित्तल यांचा वार्षिक परिक्षण दौरा होता. ते सकाळी सहा वा. कुर्डुवाडी स्थानकात आले. त्यानंतर आपल्या १४ डब्यांच्या विशेष कोचसह कुर्डुवाडी येथून मिरज स्थानकादरम्यान वार्षिक परिक्षण केले. यादरम्यान सांगोला येथे काही व्यापाऱ्यांशी किसान रेल्वेबाबत चर्चा करुन नियोजित वेळेपेक्षा तब्बल एक तास उशिराने ४.३० वा आले तत्पूर्वी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नियोजित वेळेला स्थानकात उपस्थित होते. मात्र महा व्यवस्थापकांचा ताफा मात्र एक तास उशीरा आल्याने वाट पहात बसावे लागले. यावेळी विविध संघटनांनी खा.निंबाळकरांना आपल्या विविध मागण्यांसदर्भात निवेदन दिले.
सायं.४.३० वा सुमारास रेल्वे महाव्यवस्थापकांची विशेष रेल्वे स्थानकात येताच सर्व विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. स्थानकात मोठा फौज फाटा लवाजमा उपस्थित होता. स्थानकातच शामियाना उभा करुन उपस्थित खा. निंबाळकर यांच्याशी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली.
यावेळी मुंबई -विशाखापट्ट्णम् सह विविध गाड्या रेल्वे स्थानकावर थांबा देणे बाबत,रेल्वे गेट क्र ३८ येथे भुयारी मार्गाऎवजी उड्डाणपुल बांधणे यांसह इतर मागण्या चिंकहील येथील आरपीएफ ट्रेनिंग सेंटरच्या जागेवर कोच निर्मिती फॅक्टरी सुरु करावी,वृद्ध व अपंग लोकांसाठी स्वयंचलित जीना उपलब्ध करावा, कुर्डुवाडी येथील लोकोपायलट व गार्ड यांची लॉबी कुर्डुवाडीतच रहावी, फलाट क्र ३ व ४ वर विविध सेवा उपलब्ध कराव्यात, यासह केम मधील ३५७/१ ओव्हरब्रीज खालील मार्ग दुरुस्त करावा, रेल्वे कारखान्यासाठी पुरेसा वर्कलोड द्यावा, सोलापुर कोल्हापुर गाडी दिवसा चालू करावी, रेल्वे हायस्कूल सुरु करावे आदी मागण्यांचे निवेदन विजयसिंह परबत यांनी दिले. या सर्व निवेदनावर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर लोकोपायलट लाॅबीला भेट देऊन पहाणी केली.