शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आर्त हाक
प्रतिनिधी /बेळगाव
आमची मुले अभ्यास करून परीक्षा देण्याच्या तयारीमध्ये होती. कुठल्याही आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग नव्हता. परंतु कोणताही सारासार विचार न करता पोलिसांनी आमच्या मुलांना हिंडलगा कारागृहात डांबले आहे. सीएची व इंजिनिअरिंगची परीक्षा देण्याची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना नाहक डांबल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. कृपा करून आमच्या मुलांची सुटका करा…. हे आवाहन आहे, दुर्दैवी पालकांचे.
छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची बेंगळूर येथे झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ बेळगावमध्ये निषेध करण्यात आला. मात्र पोलिसांनी याप्रकरणी अनेक तरुणांना नाहक अटक करून हिंडलगा कारागृहात डांबले आहे. यापैकी राहुल रमेश सावंत हा सीएच्या अंतिम परीक्षेची तयारी करत आहे तर भाग्येश बलराम नंद्याळकर मराठा मंडळ पॉलिटेक्नीकमध्ये शिकत आहे.
या दोघांना पोलिसांनी निष्कारण अटक करून तुरुंगात डांबले आहे. परंतु त्यांची काहीही चूक नव्हती. त्यांची लवकरात लवकर सुटका होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचा अभ्यास बुडणार असून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. लोकप्रतिनिधींसह सर्वांनी याची दखल घ्यावी आणि आमच्या मुलांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन या मुलांच्या पालकांनी शहर म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांकडे केले. पदाधिकाऱयांनी पालकांची भेट घेतल्यावेळी त्यांनी व्यथा व्यक्त केली.