गोळवण येथील कृषीसहाय्यक विशाल हांगे आत्महत्या प्रकरण
मालवण/ प्रतिनिधी-
मालवण तालुक्यातील गोळवण येथे कार्यरत असणारे कृषी सहाय्यक विशाल हांगे आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सहा संशयित आरोपींना उच्च न्यायालयाकडून सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. संशयित आरोपींच्या वतीने सीनियर कौन्सील ॲड. अभय खांडेपारकर, ॲड. स्वरुप पई व ॲड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.
गोळवण येथील कृषी सहाय्यक विशाल हांगे (मूळ रा. बुलढाणा) यांनी २९ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये संशयित आरोपींची नावे नमूद होती. त्यानंतर मयताच्या आईने संशयित आरोपींविरुद्ध विशाल याचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार गोळवण सरपंच सुभाष लाड यांच्यासह सचिन वसंत गवंडे कृषी पर्यवेक्षक मालवण, माधुरी कामतेकर ग्रामसेवक गोळवण रा. मालवण, नितीन रेकुळवाड तलाठी गोळवण रा ओरोस, श्रीकांत कोठाळे कृषी सेवक रा कुडाळ, वासुदेव चौधरी कृषी पर्यवेक्षक रा. ओरोस, विजय कांबळे कृषी सहायक रा वराड यांच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी (भा. द. वी. कलम ३०६, ३४ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सातवा संशयित आरोपी विजय कांबळे यांना अटक करून पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी नंतर जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला होता.
तर सहा संशयित यांच्या शोधासाठी दोन विशेष पोलीस पथक नियुक्त होती. मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण व पोलीस पथक अधिक तपास करत होते.