टोरांटो
कॅनडातील या शहरातील यॉर्क विद्यापीठ परिसरात एका अज्ञात हल्लेखोराने एका भारतीय विद्यार्थिनीला भोसकण्याची घटना गुरूवारी घडली आहे. भारताने या घटनेचा निषेध केला असून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या विद्यार्थिनीचे नाव राचेल अल्बर्ट असे आहे. ती गुरूवारी विद्यापीठ परिसरातील एका पदपथावरून जात असताना तेथे एका आशियायी पुरूषाने तिच्यावर चाकूहल्ला केला. हल्लेखोर व्यक्ती कोणत्या देशाची आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्याचीही ओळख घोषित करण्यात आलेली नाही. या अज्ञाताने तिच्या मानेवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला रूग्णालयात नेण्यात आले. तेथे रात्रभर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची अवस्था अद्यापही नाजूक आहे. हल्लेखोर पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. हल्लेखोर या विद्यार्थिनीच्या परिचयाचा नव्हता, असे प्रथमदर्शनी समजले असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. या विद्यार्थिनीचे भारतात असणारे आईवडिल व इतर जवळच्या नातेवाईकांना त्वरित पासपोर्ट व व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी विदेश विभागाला केली आहे. अलिकडच्या काळात कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. कॅनडा सरकारने याची गंभीर दखल घेऊन हे प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी आग्रही भूमिका भारताने घेतली आहे.