असहय़ उष्णतेने मोठय़ा संख्येत मृत्यू
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडामध्ये भीषण उकाडय़ामुळे लोक हैराण झाले आहेत. तेथील तापमान 49.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. कॅनडात उष्णलाट परसली असून व्हँकुव्हर शहरात शुक्रवारपासून बुधवारपर्यंत 130 जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृतांमधील बहुतांश जण वृद्ध होते किंवा त्यांची प्रकृती बिघडलेली होती. एवढय़ा मोठय़ा संख्येत लोकांच्या मृत्यूमागे उष्णतेची लाट कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया भागात मंगळवारी सलग तिसऱया दिवशी तापमान 49.5 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. मागील आठवडय़ापर्यंत देशातील तापमान 45 सेल्सिअसच्या पलिकडे पोहोचले नव्हते. उत्तर-पश्चिम अमेरिका आण कॅनडात उच्च दबाव क्षेत्र निर्माण झाल्याने दोन्ही देशांमध्ये उष्णतेची लाट पसरल्याचे सांगण्यात येते. व्हँकुव्हरमध्ये 65 लोकांच्या मृत्यूमागे उष्णता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
बुर्नबे या उपनगरी भागात किमान 34 तर सरेमध्ये 38 जणांचा मृत्यू झाला आहे. याहुन अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. लोकांचा जीव वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. उष्णलाटेमुळे घरातून बाहेर जवळपास अशक्य ठरल्याचे व्हँकुव्हरमधील लोकांचे म्हणणे आहे.
अमेरिकेतही 44 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. तीव्र, दीर्घ, विक्रम मोडीत काढणारे, अभूतपूर्व, असाधारण आणि धोकादायक अशी उपमा राष्ट्रीय हवामान सेवा विभागाने या उष्णलाटेला दिली आहे. वाढलेले तापमान ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी खेळाडूंसमोर समस्या उभी करत आहेत.