राहुल गांधींना भेटले पंजाबचे मुख्यमंत्री
नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी गुरुवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटले आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह बाहेर पडल्यावर काँग्रेसला कितपत फटका बसणार या मुद्दय़ावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेतृत्व अत्यंत सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्याचे आव्हान आहे. काँग्रेसचे काही नेते आपल्या संपर्कात असल्याचे कॅप्टन यांनी म्हटले होते. कॅप्टन यांनी नवा पक्ष स्थापन केल्यास काही आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे मानले जातेय.
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासोबतची ही बैठक सुमारे 2 तास चालली. या बैठकीत के.सी. वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी हरीश चौधरी देखील उपस्थित होते. तत्पूर्वी पंजाबमधील काँगेसच्या काही नाराज आमदारांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती.