माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी /पणजी
तहहयात कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आपण काही मागितलेला नव्हता. आपण आयुष्यात कधी कोणतेही पद स्वतःसाठी मागितलेले नाही व नव्हते अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी आपल्याला काही गोवा सरकारकडून कोणतेही लेखी पत्र आलेले नाही. पत्र आल्यावर त्यावर आवश्य विचार करु, असे ते म्हणाले.
दै. ‘तरुण भारत’शी बोलताना राणे यांनी कोणते कॅबिनेट पद? असा सवाल केला. त्याचबरोबर आपण सरकारकडे मागितलेले नाही. आपल्याला कोणी काही सांगितलेले नाही जर तुम्ही म्हणता ते खरे असेल तर प्रत्यक्षात सरकारचा आदेश येऊ द्या. त्यानंतरच आपण विचार करीन आणि आपली प्रतिक्रिया देईन, असे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सांगितले.
कोणी सांगितले मी निवृत्ती घेणार म्हणून?
आता हे कॅबिनेट पद मिळाल्यानंतर आपण राजकारणातून निवृत्ती घेणार का? असा सवाल केला असता राणे यांनी हे फेटाळून लावले. कोणी सांगितले मी राजकारणातून निवृत्ती घेणार म्हणून! आपण कोणालाही निवृत्ती घेणार म्हणून सांगितलेले नाही. त्याचबरोबर आपण तसा विचार केलेला नाही. निवडणुका जाहीर होऊ द्या, नंतर मी निर्णय घेईन, असेही राणे म्हणाले.
पणजीत काँग्रेस पक्षाने आपला सन्मान केला होता त्यावेळी आपण 50 वर्षे राजकारणात पूर्ण केली आता विश्रांतीची गरज आहे असे निवेदन केले होते याची याद करुन दिल्यानंतर राणे यांनी आपण तसे म्हटले असेल परंतु निवृत्ती घेतलीय असे कुठे म्हटलेले आहे? असा सवाल केला.
प्रलोभनाना राणे भुलणार नाही : गिरीश
काँगेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. प्रतापसिंह राणे यांना सक्तीने निवृत्त करण्यासाठी त्यांना आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांचे तोंड बंद करण्याचा भाजप नेत्यांचा कुटील डाव आहे. प्रतापसिंह राणे हे स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱयांपैकी नाहीत. ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. भाजपने काँग्रेस नेत्यांना प्रलोभने दाखवून त्यांना राजकारणातून उठविण्याचा प्रकार ताबडतोब बंद करावा. त्यापेक्षा भाजपचे ज्येष्ठ नेते व ज्यांनी त्या पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य केले अशा लालकृष्ण अडवाणी यांना अशा तऱहेचे पद देण्याचा किमान प्रयत्न करावा त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका. त्यांना अगोदर असे पद द्या नंतरच इतर नेत्यांचा विचार करावा असे सणसणीत उत्तर भाजपाला दिले.