4 कोटी लोकसंख्या असलेला अमेरिकेतील प्रांत
अमेरिकेतील अत्यंत सधन कॅलिफोर्निया प्रांत दुष्काळाला तोंड देत आहे. येथील जलाशयातील पाण्याचा साठा 40 वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. 4 कोटी लोकसंख्या असलेल्या या प्रांतात पाण्याची साठवणूक क्षमता केवळ 35 टक्के राहिली आहे. स्थिती अत्यंत बिघडल्याने गव्हर्नर गेविन न्यूजोम यांनी आणीबाणीची घोषणा केली आहे.
कॅलिफोर्नियातील दुसरे सर्वात मोठे ओरोविल धरण 35 चौरस किलोमीटर क्षेत्रात फैलावलेले आहे. हे धरण 40 काउंटीच्या 2.7 कोटी लोकांना जलपुरवठा करते. परंतु मागील काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हे धरण आटत चालले आहे. दुसरीकडे या सरोवरातील 200 हून अधिक हाउसबोट्सनाही बाहेर काढले जात आहे. याबाबत गव्हर्नरांनी मागील आठवडय़ात आदेश दिला होता. धरणातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने हाउसबोट्सचे नुकसान होऊ शकते, याचमुळे त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यात यावे असे म्हटले गेले होते.
ओरोविल धरणावर 1967 मध्ये पहिला जलविद्युत प्रकल्प स्थापन करण्यात आला होता, या प्रकल्पातून दरवर्षी 8 लाख घरांना विजेचा पुरवठा करण्यात येतो. धरण आटल्याने हा प्रकल्प पहिल्यांदाच बंद केला जाऊ शकतो. हा प्रकल्प कॅलिफोर्नियातील 13 टक्के वीज निर्माण करतो.