कार्यकुशल मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना पदोन्नती
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेत कार्यरत असलेले मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची दि. 18 रोजी बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उपायुक्त या पदावर पदोन्नतीने झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे आता सातारा पालिकेत बसलेली घडी विस्कटणार आहे. सातारा पालिकेला मुख्याधिकारी कोण मिळणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नती झालेले अभिजीत बापट हे सांगली जिह्यातील आष्टय़ाचे. त्यांची राज्यसेवेने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून पहिली पोस्टींग झाली होती. त्यानंतर सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी चांगला कारभार केल्यानंतर त्यांची बदली पंढरपूर येथे झाली होती. पंढरपूर येथून सोलापूर महानगरपालिकेत बदली झाली होती. तेथून पुन्हा सातारा नगरपालिकेत 11 ऑगस्ट 2020 रोजी रुजू झाले होते. त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी रंजना गगे या काही दिवसच होत्या. त्यांच्या कार्यकाळात घडी विस्कटत चालली होती. त्या कडक शिस्तीच्या असल्या तरीही अगोदर मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या कार्यकाळात ज्या तक्रारी झाल्या होत्या त्या सोडवता सोडवता त्यांना नाकीनऊ आले होते. बापट यांची पदोन्नतीने बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झाली आहे. बापट यांनी सातारा पालिकेत अनेक चांगली कामे केलेली आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेला सातारा शहरामध्ये घूसू न देण्यासाठी स्वतः ऑन दि फिल्ड राहून काम केले. कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. सातारा शहरात कोरोना काळातही समन्वय साधून विकास साधण्याचा प्रयत्न केला. दि. 18 रोजी त्यांची पदोन्नतीने बदली झाल्याचा विश्वास सातारकरांना शनिवारी बसत नव्हता. त्यांच्या जागी नव्याने कोण येणार याकडे सगळयांच्या नजरा लागल्या आहेत.