ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. असोशिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्मच्या (एडीआर) अहवालातून ही बाब समोर आली आहे.
बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये 43 मंत्र्यांनी शपथ घेतली असून, मंत्र्यांची एकूण संख्या 78 आहे. या 78 मंत्र्यांपैकी 33 मंत्र्यांवर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामधील 24 मंत्र्यांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गुन्हे दाखल आहेत.
एडीआरच्या अहवालानुसार, 35 वर्षीय केंद्रीय गृहराज्यमंत्री निसित प्रामाणिक यांच्या विरोधात भादंविच्या कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधातही हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवि 307) गुन्हा दाखल असल्याचे या अहवालात म्हटले आहे.