ऑनलाईन टीम
केंद्रातील मोदी सरकारने देशवासियांसाठी आणखीन एका मोठ्या योजनेची घोषणा केली. प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियान (PM-DHM) योजना असे या योजनेचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियान (PM-DHM) योजना सुरू करणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
पूर्वी ही योजना नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (NDHM) या नावाखाली सुरू होती. प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियान, माहिती आणि पायाभूत सुविधांच्या विस्तृत श्रेणीद्वारे कार्यक्षम, प्रवेशयोग्य, सर्वसमावेशक, परवडणारे आणि सुरक्षित पद्धतीने सार्वत्रिक आरोग्य संरक्षण प्रदान करते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अंतर्गत, लोकांची डिजिटल आरोग्य ओळखपत्रे बनवली जातील. २७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या मिशनची देशव्यापी घोषणा करतील. या हेल्थ आयडीमध्ये व्यक्तीचा संपूर्ण वैद्यकीय माहिती असणार आहे. यामुळे नागरिकांना आपले आरोग्य अहवाल आता या ओळखपत्रात सुरक्षित ठेवता येणार आहेत. लोकांना अनेकदा त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी किंवा उपचारासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. कधीकधी सर्व आरोग्य अहवाल घेऊन जाणे शक्य नसते किंवा कधी काही अहवाल गहाळ होण्याची शक्यता असते. मात्र या कार्डमुळे आता नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
गेल्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान मोदी आरोग्य ओळखपत्राची घोषणा केली. हे आरोग्य ओळखपत्र प्रथम ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये (अंदमान आणि निकोबार, चंदीगड, लडाख, लक्षद्वीप, पुदुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमन दीव) सुरू करण्यात आले. आता ते देशभरात लागू केले जात आहे.