कोझिकोड स्थानकावर 100 जिलेटिन कांडय़ा, 350 डिटोनेटर जप्त
कोझिकोड / वृत्तसंस्था
मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर स्फोटके सापडल्यानंतर दुसऱयाच दिवशी केरळमध्ये एका प्रवासी रेल्वेमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली. कोझिकोड स्थानकावर एका प्रवासी रेल्वेमधून 100 हून अधिक जिलेटिनच्या कांडय़ा आणि 350 डिटोनेटर सापडले असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त केला आहे.
केरळमध्ये सुरक्षादलाने शुक्रवारी एका महिला प्रवाशाकडून मोठय़ा प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. कोझिकोड रेल्वे स्थानकावर एका महिलेकडून 100 जिलेटिनच्या कांडय़ा आणि 350 डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. स्फोटकांप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव रमानी असे असून तिची रेल्वे पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे. सदर महिला मूळची तामिळनाडूची आहे. चौकशी केली असता विहीर खोदण्यासाठी स्फोटके नेत असल्याचा दावा तिने केला आहे. दरम्यान, अधिकाऱयांनी यासंबंधी कोणतेही वक्तव्य केले नाही.
स्फोटकांबाबत तर्क-वितर्क
केरळात आढळलेल्या स्फोटकांचा संबंध बालाकोट एअरस्ट्राईकशी जोडला जात आहे. भारतीय हवाई दलाने दोन वर्षांपूर्वी 26 फेब्रुवारीला पीओकेमध्ये घुसून अनेक दहशतवादी तळ नष्ट केले होते. या हल्ल्याच्या दिवशीच स्फोटके सापडल्याने हा मोठय़ा कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तसेच दुसरीकडे केरळमध्ये विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची पूर्वतयारी सुरू असतानाच स्फोटके सापडल्याने दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, तपास अधिकाऱयांनी या चर्चांबाबत कोणतेही भाष्य केलेले दिसत नाही.