प्रतिनिधी/ खेड
गणेशोत्सवात कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित गाडय़ांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने वेटींगवर असलेल्या चाकरमान्यांच्या रेल्वे प्रशासनाने सुखद धक्काच दिला आहे. गणेशोत्सवासाठी 5 गणपती स्पेशल गाडय़ा जाहीर केल्या आहेत. या स्पेशल गाडय़ांच्या तब्बल 74 फेऱया धावणार असल्याने गणेशभक्तांच्या मार्गातील अडथळे काही अंशी दूर झाले आहेत. या गाडय़ांचे आरक्षण 4 जुलैपासून खुले होणार असल्याने चाकरमान्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
गणेशोत्सवात धावणाऱया नियमित गाडय़ांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रतीक्षा यादीतील चाकरमान्यांना गाव गाठण्याची चिंता लागून राहिली होती. चाकरमान्यांच्या नजरा गणपती स्पेशल गाडय़ांकडे रोखलेल्या असतानाच रेल्वे प्रशासनाने 5 गणपती स्पेशल गाडय़ा जाहीर करत गणेशभक्तांना सुखद धक्काच दिला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-सावंतवाडी नियमित स्पेशल, नागपूर-मडगाव साप्ताहिक स्पेशल, पुणे-कुडाळ स्पेशल, पुणे-थिविम स्पेशल, पनवेल-कुडाळ स्पेशल गाडय़ांचा समावेश आहे.
01137/01138 क्रमांकाची छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-सावंतवाडी नियमित स्पेशल 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत धावणार असून 44 फेऱयांचा समावेश आहे. ही स्पेशल सीएसएमटी मुंबई येथून रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सुटून त्याचदिवशी दुपारी 2 वा. सावंतवाडीला पोहचेल. परतीच्या प्रवासात दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सावंतवाडी येथून सुटून दुसऱया दिवशी पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी सीएसएमटी येथे पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आदी ठिकाणी थांबे आहेत.
01139/01140 क्रमांकाची नागपूर-मडगाव साप्ताहिक स्पेशलच्या 24 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत 12 फेऱया धावणार आहेत. ही स्पेशल नागपूर येथून दर बुधवार व शनिवारी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी सुटेल. परतीच्या प्रवासात दर मंगळवारी व रविवारी मडगाव येथून सायंकाळी 7 वाजता सुटून दुसऱया दिवशी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी नागपूर येथे पोहचेल. कोकण मार्गावर ही गाडी पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी आदी स्थानकांत थांबेल.
01141/01142 क्रमांकाच्या पुणे-कुडाळ स्पेशलच्या 6 फेऱया धावणार आहेत. 23 व 30 ऑगस्ट, 6 सप्टेंबर या दरम्यान धावणारी ही स्पेशल पुणे येथून रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी दुपारी 2 वाजता कुडाळ येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात कुडाळ येथून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी पहाटे 6 वाजून 50 मिनिटांनी पुणे येथे पोहचेल. या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आदी स्थानकांत थांबे आहेत.
01145/01146 क्रमांकाची पुणे-थिविम स्पेशल 26 ऑगस्ट, 2 व 9 सप्टेंबर दरम्यान धावेल. या स्पेशलच्या 6 फेऱया धावणार आहेत. पुणे येथून सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी थिविम येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात 28 ऑगस्ट, 4 व 11 सप्टेंबरदरम्यान धावणारी स्पेशल थिविम येथून सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी पुणे येथे पोहचेल.
01143/01144 क्रमांकाची पनवेल-कुडाळ स्पेशल 28 ऑगस्ट, 4 व 11 सप्टेंबर दरम्यान धावेल. ही स्पेशल पनवेल येथून पहाटे 5 वाजता सुटून दुसऱया दिवशी दुपारी 2 वा. कुडाळ येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात 27 ऑगस्ट, 3 व 10 सप्टेंबरदरम्यान धावणारी स्पेशल कुडाळ येथून दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी पनवेल येथे पोहचेल.