प्रतिनिधी / वाकरे
कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कोपार्डे (ता. करवीर) येथील जनावरांचा आठवडी बाजार काही सूचनांचे पालन करून शनिवार दि ३१ ऑक्टोबरपासून सुरु करण्यास करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी एका आदेशानुसार परवानगी दिल्याची माहिती शिवसेनेचे करवीर तालुका उपप्रमुख व्ही.जी. पाटील (कोपार्डे) यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरातील मार्केट
यार्डनंतर कोपार्डे (ता. करवीर) येथील जनावरांचा आठवडी बाजार प्रसिद्ध आहे. गेले सात महिने देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडॉउन सुरू आहे. या लॉकडाउनमुळे २५ मार्चपासून गेले सात महिने हा जनावरांचा बाजार बंद आहे. बाजार बंद असल्याने जनावरांची होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल बंद आहे. तसेच ग्रामपंचायतीला मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बंद आहे. जनावरांचा बाजार बंद असल्याने गाय, म्हैस, बैल अशी जनावरे घेणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. ऐन मे महिन्यात हा बाजार बंद असल्याने पेरणीच्या हंगामातच जनावरांची खरेदी विक्री बंद झाली होती.
सध्या पावसाळा संपला असून सुगीचा हंगाम सुरू आहे. तसेच तसेच भात कापणी, भुईमूग, सोयाबीन काढण्याची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर ऊस लागण आणि पुढील पिकांच्या मशागतीचे काम सुरू आहे. येत्या आठवड्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. पण जनावरांचा बाजार बंद असल्याने जनावरांची खरेदी-विक्री ठप्प झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती.
शिवसेनेचे करवीर तालुका उपप्रमुख व्ही .जी. पाटील यांनी याबाबत प्रशासक बी.एच.जगताप आणि ग्रामविकास अधिकारी एम.एस.पाटील यांना निवेदन दिले होते. त्यांनी सदरचे निवेदन पंचायत समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले होते. करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी प्रशासकांना पत्र पाठवून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्बंध शिथिल करणे व टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यामधील आदेश क्रमांक ४ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, कोरोनाच्या शिष्टाचाराचे पालन करावे, भौतिक अंतर पाळावे, बाजारातील जागेचे निर्जंतुकीकरण करावे, तसेच आरोग्य विषयक समस्या आल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर राहील असे निर्देश देऊन हा बाजार ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतीने शनिवार दि.३१ ऑक्टोबर पासून हा बाजार सुरू करण्याचे नियोजन केले आहे.बाजाराची साफसफाई सुरू आहे.तब्बल ७ महिन्यानंतर हा जनावरांचा बाजार पुन्हा गजबजणार आहे. यावेळी पोलीस पाटील जालिंदर जामदार,दत्तात्रय पाटील, गोविंदा पाटील,एल.आर. कांबळे, श्रीधर पाटील, सागर जामदार उपस्थित होते.