लोणंद / प्रतिनिधी :
तरडगाव ता. फलटण गावच्या हद्दीत चारचाकी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने गाडीतील ५ लाख ३४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरडगाव ता. फलटण गावच्या हदीत परहर फाटा ते मॅग्नेशिया जाणाऱ्या रोडवरील रेल्वे पुलानजीक कृष्णात हरिदास गायकवाड (वय ३४ वर्ष रा तरडगाव) हे लेबर कॉन्ट्रक्टर त्यांच्या क्रेटा गाडीतुन जात होते. त्यांनी रेल्वे पुलाजवळ गाडी स्लो केली असता दोन दुचाकींवरून आलेल्या अनोळखी पाच जणांनी कोयत्याचा धाक दाखवत गाडीची काच फोडली. तसेच गाडीमधील ५ लाख ३४ हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि कारची चावी चोरून नेली. याबाबत अधिक तपास सपोनि विशाल वायकर करत आहेत.