पावसाची ओढ पण पाणी साठा चांगला
प्रतिनिधी/ सातारा
यावर्षी जूनमध्ये कोसळलेला मान्सून, उन्हाळय़ात पडलेल्या अवकाळी पावसामुळे जुलै महिन्यात पावसाने ओढ दिलेली असली तरी गतवर्षीच्या जुलैपेक्षा यावर्षी सर्व धरणांमध्ये चांगला साठा झालेला आहे. सध्या जिल्हय़ाला जोरदार पावसाची अपेक्षा असली तरी पाऊस तुरळक स्वरुपात पडत आहे. पश्चिम भागात सोमवारपासून पावसाचा जोर वाढला असला तरी पूर्वेकडील भागात अधूनमधून रिमझिम सुरु आहे. दरम्यान, जिल्हय़ात आजमितीपर्यंत सरासरी 90.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सिंचन मंडळाकडून आलेल्या माहितीनुसार सध्या कोयना धरणात 52.29 टीएमसी पाणी साठा असून गतवर्षी जुलैमध्ये तो 42.36 टीएमसी होता. त्याच प्रमाण धोम 4.75, धोम बलकवडी 2.01, कण्हेर 4.32, उरमोडी 5.32 व तारळी 3.83 टीएमसी पाणी साठा सध्या आहे. गतवर्षी जुलैपेक्षा थोडा जास्त पाणी साठा या धरणांमध्ये असून गतवर्षी जुलै महिन्यात या सर्व धरणांमध्ये 61.46 टीएमसी पाणी साठा होता. यावर्षी तो 66.60 टीएमसी म्हणजे 5.60 टीएमसी एवढा जादा आहे.
त्या पध्दतीने येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा गुरेघर, उत्तरमांड, कुडाळी महू, कुडाळी हातगेघर, वांग मराठवाडी या मध्यम प्रकल्पांमध्ये देखील गेल्या वर्षी जुलै महिन्यात एकूण 2.21 टीएमसी पाणी उपलब्ध होता. यावर्षीच्या जुलैमध्ये त्यात वाढच असून तो 3.03 टीएमसी एवढा आहे. या सर्व धरण क्षेत्रात अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहे.
दरम्यान, जिल्हय़ात अनेक ठिकाणी अद्याप पावसाने ओढ दिलेली आहे. मात्र, पश्चिम भागात रविवारी रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे रखडलेली भात लावणीचे काम सुरु झालेले आहे. तर सोयाबीन, भुईमूग आदी पिकांना पावसाची गरज होती. सोमवारपासून पाऊस सुरु झाल्याने या पिकांना संजीवनी ठरला आहे.
जिह्यात सरासरी 8.2 मि.मी. पाऊस
जिह्यात रविवारी दिवसभरापासून आज सोमवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 8.2 मि. मी. पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 90.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 6.4 (260.9) मि. मी., जावळी- 9.4 (91) मि. मी. पाटण 10.3 (103.1) मि. मी. कराड 6.1 (53.6) मि. मी. कोरेगाव 5.1 (71.9) मि. मी., खटाव-4.3 (35.6) मि. मी. माण- 5.6 (113.1) मि. मी., फलटण- 1.8 (64.2) मि. मी., खंडाळा- 0.5 (41.2) मि. मी. वाई-10.9 (95.2) मि. मी. महाबळेश्वर-49.9 (497.6) मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.