- 15 मे पर्यंत वाढेल निर्बंध
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाब सरकारने रविवारी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार आता ज्या नागरिकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल त्याच नागरिकांना पंजाबमध्ये प्रवेश मिळणार आहे. यासोबतच 15 मे पर्यंत आवश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. तसेच कारमधून केवळ दोन लोकांनाच प्रवास करण्यास मुभा असणार आहे. पंजाब सरकारकडून ही नवी नियमावली तात्काळ लागू करण्यात आली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नव्या आदेशात निगेटीव्ह रिपोर्टसह कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तीस प्रमाणपत्र दाखवल्यावर राज्यात प्रवेश मिळणार आहे. तसेच मोटार सायकलवरुन आता केवळ एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. कार आणि टू व्हीलरसाठी एक सूट देखील देण्यात आली आहे. यामध्ये गाडीवर चालकासह जर कोणी कोरोनाचा रुग्ण असेल तर प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.
अन्य नियम :
- सर्व प्रकरच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
लग्नकार्य आणि अंतिम विधीसाठी आता 10 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.
- सरकारी कार्यालये आणि बँकांमध्ये 50 % क्षमतेने कर्मचारी काम करतील.
- भाजी आणि फळ मार्केटमध्ये केवळ घाऊक विक्रेत्यांना भाजी विकण्यास परवानगी असेल. किरकोळ विक्रेते मार्केटमध्ये भाजी विकू शकणार नाहीत.
- हॉटेल, धाबा, रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्यास पूर्णपणे बंदी असून केवळ पार्सल सेवा सुरू राहील.
- सायंकाळी 6 वाजल्यापासून सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवली जातील. मंदिर, चर्च, गुरुद्वारा, मशिदीच्या जवळ भाविकांना जमाव गोळा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- हे सुरू असेल :
- मेडिकल दुकाने, दूध, भाजीपाला, फळांची दुकाने, डेअरी यासोबतच मोबाईल फोन दुरुस्तीची दुकाने सुरू असणार आहेत.
- प्रयोगशाळा, नर्सिंग होम, मेडीकल संस्थाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.