वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हॉकी संघातील हॉकीपटू मनदीप सिंग आणि अन्य पाच जणांना कोरोनाची बाधा यापूर्वी झाली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. दरम्यान मनदीप सिंगच्या रक्तातील प्राणवायुची पातळी कमी झाल्याने त्याला बेंगळूरमधील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे साईच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले.
बेंगळूरच्या साईच्या क्रीडा संकुलात भारतीय हॉकी संघासाठी 20 ऑगस्टपासून राष्ट्रीय सराव शिबीर आयोजित केल्याने विविध ठिकाणाहून हॉकीपटू बेंगळूरमध्ये या सरावात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान या शिबिरात दाखल होणाऱया हॉकीपटूपैकी 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना बाधीत हॉकीपटूमध्ये कर्णधार मनप्रित सिंग, सुरेंद्रकुमार, जेसकरण सिंग, वरूणकुमार, गोलरक्षक कृष्णन पाठक आणि मनदीप सिंग यांचा समावेश आहे. बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टरांकडून कोरोना बाधीत हॉकीपटूंवर वैद्यकीय उपचार चालू आहेत.
मनदीप सिंगवर वैद्यकीय उपचार चालू असून सोमवारी रात्री त्याच्या रक्तातील प्राणवायूची पातळी कमी होत असल्याचे आढळून आल्याने खबरदारीचे उपाय म्हणून त्याला लागलीच येथील एसएस स्पर्श खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 25 वर्षीय मनदीप सिंगने आतापर्यंत 129 सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व करताना 60 गोल नोंदविले आहेत. 2018 साली आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघामध्ये मनदीप सिंगचा समावेश होता.