वृत्तसंस्था/ प्राग्वे
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या प्राग्वे आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत युजीन बुचार्डने सोमवारी पहिल्या दिवशी एकेरीत विजयी सलामी देताना आठव्या मानांकित वुडेरमेटोव्हाचा पराभव केला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने काही सामने अर्धवट स्थितीमध्ये थांबवावे लागले.
कोरोना महामारी परिस्थितीमुळे तब्बल पाच महिन्यानंतर डब्ल्यूटीए टूरवरील ही दुसरी स्पर्धा आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करत गेल्या आठवडय़ात पालेर्मो टेनिस स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेवेळी प्रेक्षक तसेच प्रसार माध्यमावर निर्बंध घालण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱया टेनिसपटूंना त्यांचे स्वत:चे टॉवेल्स वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच हस्तांदोलन करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. स्पर्धेच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये सहभागी होणाऱया टेनिसपटूंना आयसोलेशनसाठी तरतूद करण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात बुचार्डने आठव्या मानांकित कुडेरमेटोव्हाचा 6-0, 6-3 असा पराभव करत क्ले कोर्टवरींल स्पर्धेत 2018 नंतर आपला पहिला विजय नोंदविला. रशियाच्या कुडेरमेटोव्हावरील बुचार्डचा हा दुसरा विजय आहे. कॅनडाच्या बुचार्डला या स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.झेकच्या प्लिसकोव्हा आणि प्रूव्हर्टोव्हा यांच्यातील पहिल्या फेरीचा सामना पावसामुळे अर्धवट स्थितीत थांबवावा लागला. या स्पर्धेत रूमानियाच्या हॅलेपला टॉप सेडिंग देण्यात आले आहे.