वृत्तसंस्था/ दुबई
कोरोना महामारीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत असून विविध देशातील कोरोना परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनामुळे आयसीसीचे सर्व स्पर्धा वेळापत्रक कोलमडले आहे. आता आयसीसीने खबरदारीचे उपाय म्हणून चालू वषी होणाऱया दोन पात्र फेरीच्या स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
नामिबियामध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात होणारी पुरुषांची विश्वचषक क्रिकेट लिग-2 पात्र फेरीची स्पर्धा त्याचप्रमाणे टांझानियामध्ये ऑगस्ट महिन्यात होणारी 19 वर्षांखालील वयोगटाची विश्वचषक विभागीय डिव्हिजन-2 पात्र फेरीची स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. 2023 साली भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र फेरीची स्पर्धा नामिबियात घेतली जाणार होती. या पात्रफेरीच्या स्पर्धेत यजमान नामिबिया, पापुआ न्यूगिनिया आणि अमेरिका या तीन संघांचा समावेश होता.
टांझानियातील ऑगस्टमध्ये होणाऱया आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील विश्वचषक विभागीय डिव्हिजन-2 पात्र फेरीच्या स्पर्धेत बोट्सवाना, केनिया, मोझंबिक, रवांडा, सिरा लिओनी आणि यजमान टांझानिया या संघांचा समावेश होता. सदर स्पर्धा 7 ते 14 ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार होती. पण कोरोना परिस्थिती आफ्रिकन खंडातही चिंताजनक होत असल्याने या दोन्ही पात्र फेरीच्या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आसीसीने घेतला आहे.