प्रतिनिधी /रत्नागिरी :
रत्नागिरीतील प्रसिध्द बालरोगतज्ञ व जिल्हय़ातील 42 बालकांना कोरोनामुक्त करणाऱया डॉ. दिलीप मोरे यांचे गुरूवारी पहाटे जिल्हा कोव्हीड रूग्णालयात उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. गेले काही दिवस ते कोरोनाशी लढा देत होते त्यांच्या प्रकृतीत मध्यंतरी सुधारणा झाली होती. मात्र बुधवारी अचानक त्यांची प्रकृती गंभीर बनली व गुरूवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
डॉ. दिलीप मोरे यांनी बालरोगतज्ञ म्हणून जिल्हा शासकीय रूग्णालयात 25 वर्षांहून अधिक काळ चांगली सेवा बजावली. शासकीय रूग्णालयात इतकी दीर्घ सेवा बजावणारे ते रत्नागिरीतील पहिलेच डॉक्टर होते. कोरोना काळात त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावत तीन महिन्यात तब्बल 40 नवजात बालकांवर यशस्वीपणे उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्याची कामगिरी डॉ. मोरे यांनी बजावली. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात 6 महिन्याच्या बाळावर यशस्वी उपचार केल्यानंतर लहान बालकेही कोरोनामुक्त होऊ शकतात हा विश्वास डॉ. मोरे यांनी प्रशासनाला दिला होता.
रूग्णसेवा करण्याच्या आकांक्षेने त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही शासकीय रूग्णालयात रूग्णांवर उपचार केले. वयाच्या 65व्या वर्षातही त्यांनी केलेली कामगिरी खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र, कोरोनायोद्धा म्हणून महत्वाची भुमिका बजावणाऱया डॉ. मोरे यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सेवा थांबवली अन् अहवाल पॉझीटीव्ह
जिल्हय़ातील बालकांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिलीप मोरे यांनी निवृत्तीनंतरही जिल्हा शासकीय रूग्णालयातील सेवा सुरूच ठेवली होती. दोन आठवडय़ापूर्वी त्यांनी वयाची 65 वर्षे पुर्ण झाल्याने सिव्हीलमधील सेवा थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. 60 वर्षावरील व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना सरकारने केल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर डॉ. मोरे यांनी सेवा थांबवण्याचा निर्णय घेत तसे पत्रही त्यांनी प्रशासनाला दिले. त्याच्या दुसऱयाच दिवशी त्यांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला होता.